-वृक्षारोपणातून मातृप्रेम, संस्कार आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश; महाविद्यालय परिसरात १५ विविध वृक्षांची लागवड
लोणार (वाजिद खान) : स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार येथे दि. २४ जुलै २०२६ रोजी कै. कमलाबाई बनमेरू यांच्या पुण्यस्मरणार्थ ‘एक पेड माँ के नाम’ हा प्रेरणादायी आणि पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश के. बनमेरू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून मातृप्रेम, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कै. कमलाबाई बनमेरू या प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांच्या मातोश्री होत. त्यांच्या कष्टाळू, संस्कारशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या कुटुंबातील सातही मुलांनी शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिक्षणाचे महत्त्व, समाजसेवेची भावना आणि मूल्याधिष्ठित जीवनाची जपणूक करण्याचे संस्कार त्यांनी आपल्या कुटुंबात रुजविले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि मातृप्रेमाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. अमृत सेवा संस्थेच्या माध्यमातून सन २०१८ मध्ये कै. कमलाबाई बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयाची स्थापना त्यांच्या नावाने करण्यात आली आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महाविद्यालय परिसरात ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात फणस, व्हाईट टर्मिनालिया, नारळ आदींसह पर्यावरणपूरक व उपयुक्त अशा एकूण १५ विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आईचे संस्कार हे प्रत्येक व्यक्तीच्या यशाचा भक्कम पाया असतात. आईच्या स्मृती जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजासाठी आणि पर्यावरणासाठी सकारात्मक कार्य करणे. वृक्षारोपण ही केवळ पर्यावरण संरक्षणाची कृती नसून भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याची जबाबदारी आहे.” कार्यक्रमाला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. सौरभ गायकवाड, कार्यक्रम समन्वयक डॉ. कमलाकर वाव्हळ, प्रा. शिवशंकर मोरे, श्री. रमेश बनमेरू, प्रा. डॉ. सूर्यकांत बोरुळ, प्रा. शारिक शेख, डॉ. मिलिंद गायकवाड, डॉ. महेंद्र भिसे, डॉ. मंगेश ठोंबळ, श्री. अनिल बनमेरू तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची सामूहिक शपथही घेतली.
मातृप्रेम, संस्कार आणि पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात आईविषयी कृतज्ञतेची भावना अधिक दृढ केली. तसेच महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार करण्याबरोबरच समाजात पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.