-आधार प्रमाणीकरण, अॅग्रीस्टॅक नोंदणी व बँक खाते लिंकिंग अनिवार्य; प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही लाभ
बुलढाणा (सुरेश हुसे) : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील १२ हजार १०७ शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, या शेतकऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या सर्व प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण केल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नसल्याने, कोणताही विलंब न करता आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण, अॅग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत नोंदणी व प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. तसेच आधार क्रमांक आणि बँक खाते परस्पर लिंक नसल्यास संबंधित सहकारी संस्था किंवा बँकेशी संपर्क साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आधार प्रमाणीकरण, अॅग्रीस्टॅक नोंदणी तसेच इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सहकारी संस्था, ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा अधिकृत सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान कोणतीही अडचण किंवा तक्रार उद्भवल्यास संबंधित तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे संपर्क साधून दाद मागता येणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.