-वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा शंभर टक्के प्रतिसाद; पोलिसांकडून कडक बंदोबस्त
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी, २३ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत साखरखेर्डा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला गावातील व्यापारी वर्गाने शंभर टक्के प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदविला.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा युवा अध्यक्ष विशाल श्रीराम गवई यांनी २२ जुलै रोजी साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन देऊन बंदची पूर्वकल्पना दिली होती. त्यानुसार लोकशाही मार्गाने बंदचे आयोजन करण्यात आले. दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज आणि त्यानंतर विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई निषेधार्ह असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.
बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा अध्यक्ष विशाल गवई, पुंजाजी मोरे, संदीप इंगळे, प्रवीण गवई, महेंद्र भालके, सोहम गवई, प्रदीप खिल्लारे, किरण इंगळे, उत्तम अडागळे, अविष्कार गवई, कुणाल गवई, वैभव गवई, आकाश गवई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.