-रक्तदान हेच सर्वोच्च सामाजिक दायित्व; भाजपच्या उपक्रमातून रुग्णांना जीवनदानाचा संदेश
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे म्हणाले की, राज्यात आणि देशात अनेक रुग्ण विविध आजारांवर उपचार घेत असून त्यांना वेळोवेळी रक्ताची गरज भासत असते. अशा वेळी रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम हा अनेकांना जीवनदान देणारा ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजसेवेचा संकल्प करण्यात आला असून, साखरखेर्ड्यातील युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमाला यशस्वी केले आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे शेतकरी, शेतमजूर, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या रक्तदान शिबिराला भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे, शंकरराव उगलमुगले, गजानन घुले, गणेश नागरे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे, दीपक रिंढे, निलय बंगाळे, डिगंबर गाडे, राहुल झोरे, कृष्णा सपकाळ, संदीप वाघ, गोपाल पाझडे, सुनील काळूसे, सुधाकर गीते, प्रभाकर कायंदे, दीपक घुगे, अमोल अवचार, अशोक पाटील, बालाजी नाझरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.