-ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणीवेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर अनुपस्थित; राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधनिर्माता गोपाल मानतकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र कार्यक्रमानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली असता, त्या पाहणीत डॉ. शशिकांत खेडेकर सहभागी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना या पाहणीतून डावलण्यात आले की हा केवळ योगायोग होता, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
१९ जुलै रोजी आयोजित सेवापूर्ती सोहळ्यास विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीची पाहणी करण्यासाठी नेले. मात्र त्यावेळी साखरखेर्ड्यात उपस्थित असलेले माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर या पाहणीत दिसून आले नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय चर्चांना सुरुवात झाली. याशिवाय कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनाही या पाहणीबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याची चर्चा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सिंदखेडराजा मतदारसंघातील साखरखेर्डा जिल्हा परिषद गटात शिंदे शिवसेनेत दोन वेगवेगळे राजकीय प्रवाह निर्माण झाल्याची चर्चा सातत्याने होत आहे. एका बाजूला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे नेतृत्व मानणारा गट तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या समर्थकांची स्वतंत्र ताकद असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सिंदखेडराजा मतदारसंघात सक्रिय जनसंपर्क सुरू केला आहे. आरोग्य शिबिरे, महिला मेळावे, पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा, सामाजिक कार्यक्रमांतील उपस्थिती आदी माध्यमांतून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र संपर्क वाढविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
याचबरोबर साखरखेर्डा जिल्हा परिषद गटात महेंद्र पाटील यांचे नावही संभाव्य दावेदार म्हणून चर्चेत आहे. मात्र ते योगेश जाधव यांच्या सोबत सक्रिय दिसत असल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबतही विविध तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. दुसरीकडे श्रीनिवास खेडेकर यांच्या पत्नी भाग्यश्री खेडेकर यांनीही या गटावर दावा करण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेतील अंतर्गत समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे चित्र दिसत आहे. इतर पक्षांच्या दृष्टीने पाहिल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील हे प्रमुख चेहरा मानले जात आहेत. काँग्रेसकडून शिवदास रिंढे यांचे नाव चर्चेत असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामभाऊ जाधव किंवा पक्ष नेतृत्वाने निश्चित केलेला उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण परिसरात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा प्रभाव अद्याप कायम असल्याचेही बोलले जाते.
ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीपासून ते इमारतीच्या उभारणीपर्यंतच्या प्रक्रियेत विविध नेत्यांचे योगदान राहिले आहे. ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या कार्यकाळात मिळाली, तर इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पाठपुरावा केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. स्वतः डॉ. खेडेकर यांनीही अनेकदा या प्रकल्पासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे सहकार्य लाभल्याचे सार्वजनिकपणे नमूद केले आहे. अशा परिस्थितीत, ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणीवेळी डॉ. शशिकांत खेडेकर यांची अनुपस्थिती हा केवळ योगायोग होता की त्यामागे काही राजकीय संदेश होता, याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नसली तरी स्थानिक राजकारणात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, सर्वसुविधांनी सुसज्ज इमारत तयार असूनही ग्रामीण रुग्णालय अद्याप सुरू झाले नसल्याने नागरिकांचे लक्ष आता उद्घाटन आणि प्रत्यक्ष सेवा कधी सुरू होणार याकडे लागले आहे.