-वडिलांच्या निधनानंतरही शिक्षणाची वाट न सोडता मुंबईतून बी.एस.डब्ल्यू. पदवी संपादन; सध्या अझीम प्रेमजी विद्यापीठात उच्च शिक्षण
बिबी (ऋषी दंदाले) : प्रतिकूल परिस्थिती ही यशाच्या वाटेतील अडथळा नसून जिद्द, चिकाटी आणि कष्ट यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण लोणार तालुक्यातील चिखला काकड येथील विनायक द्वारका लक्ष्मी जगन्नाथ काकड यांनी घालून दिले आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या विनायक यांनी मुंबईतील नामांकित निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क येथून समाजकार्यात (बी.एस.डब्ल्यू.) पदवी यशस्वीरीत्या संपादन केली. नुकत्याच महाविद्यालय परिसरात पार पडलेल्या पदवीदान समारंभात महाविद्यालयाच्या अध्यक्षा फिलोमिना सेक्वेरिया यांच्या हस्ते त्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
विनायक काकड हे लोणार तालुक्यातील चिखला काकड गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत. वडिलांच्या अकाली निधनानंतर घरातील एकुलते एक पुत्र म्हणून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मात्र, कठीण परिस्थितीसमोर न डगमगता त्यांनी शिक्षणाची वाट अखंड सुरू ठेवली. आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत त्यांनी समाजकार्याची वाट निवडली आणि आपल्या जिद्दीच्या बळावर पदवीचे स्वप्न साकार केले. समाजकार्य ही केवळ पदवी नसून समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुर्बल घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारी स्वीकारण्याची प्रक्रिया असल्याचा विचार त्यांनी आपल्या कृतीतून जपला आहे. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सध्या विनायक काकड हे अझीम प्रेमजी विद्यापीठ, बेंगळुरू येथे उच्च शिक्षण घेत असून समाजविकास, लोकसहभाग, सामाजिक न्याय आणि परिवर्तनवादी नेतृत्व या विषयांचा सखोल अभ्यास करत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करून लोककेंद्रित विकास प्रक्रियेत प्रभावी योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ करिअरकेंद्रित शिक्षणापेक्षा मूल्याधिष्ठित आणि समाजाभिमुख शिक्षण अधिक महत्त्वाचे ठरत आहे. अशा काळात समाजकार्य क्षेत्राची निवड करून उच्च शिक्षणाची यशस्वी वाटचाल करणारे विनायक काकड हे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, शिक्षक, सहकारी, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.