-दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन; राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन
लोणार (वाजिद खान) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध शैक्षणिक व रोजगारविषयक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध नोंदवत लोणार शहर काँग्रेस कमिटी व लोणार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार, २३ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रुजी फुके आणि शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष आबेद खान, गटनेते नितीन शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात असून, त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांना आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आल्याची कारवाईही निषेधार्ह आहे. या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
केंद्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी नगरसेवक पंढरी चाटे, सभापती अब्दुल उबेद हाजी अब्दुल मुनाफ, नियोजन सभापती साहेबराव पवार, नगरसेवक अरुण जावळे, गुलाब सरदार, शाम राऊत, जमील कुरेशी, रमजान परसुवाले, दौलत मानकर, शेख रऊफ, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, गोपी आखाडे, एजाज खान, सतीश राठोड, युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल सोनुने, अनिल पाटोळे, भवानी मापारी, प्रा. विठ्ठल भानुसे, शेख अफसर शेख तुराब, आसाराम शिंदे, बहुजन आघाडीचे नेते प्रा. के. बी. इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, युवा आघाडीचे गौतम गवई, महेंद्र मोरे, दीपक अंभोरे, पवन अवसरमोल, बडी मोरे, अमित काकडे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन शेख समद यांनी केले.
बॉक्स : जाहीर पाठिंबा
लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीने राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै २०२६ रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा दिला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करत लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.