-एका महिन्यात काम पूर्ण करा, अन्यथा कृषी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा यांना निवेदन देऊन तालुक्यातील बंद व अकार्यक्षम पर्जन्यमापक यंत्रणा तात्काळ सुरू कराव्यात तसेच प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नवीन पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार या तीनही तालुक्यांतील पर्जन्यमापक यंत्रणांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. अनेक निवेदने, आंदोलने आणि पत्रकार परिषदांनंतरही याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. किनगाव राजा येथील पर्जन्यमापक यंत्रणा बंद असल्याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीत केली होती. त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नवीन पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. समितीने आरोप केला आहे की, बंद पर्जन्यमापक यंत्रणेमुळे मागील वर्षी अतिवृष्टीची अचूक नोंद झाली नाही. परिणामी अनेक शेतकरी पीकविमा तसेच नैसर्गिक आपत्तीच्या मदतीपासून वंचित राहिले. प्रत्यक्षात हजारो एकर शेतीचे नुकसान झाल्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी आले होते. मात्र, नुकसान स्पष्ट दिसत असतानाही त्याची अचूक नोंद पर्जन्यमापक यंत्रणेत का झाली नाही, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. संघटनेने सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व बंद पर्जन्यमापक यंत्रणा तातडीने कार्यान्वित कराव्यात, प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नवीन यंत्रणा बसवावी, दररोजचा पर्जन्यमान अहवाल सार्वजनिक करावा तसेच ही योजना रखडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या निवेदनानंतर एका महिन्याच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सिंदखेडराजा येथे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. वारंवार आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवावी, अन्यथा कृषी विभागाच्या शेतकरीविरोधी भूमिकेविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.