-आमदार मनोज कांयदे यांच्या शिफारशीने नियुक्ती; परिसरात समाधानाचे वातावरण
बिबी (ऋषी दंदाले) : लोणार तालुक्यातील बिबी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कांयदे यांच्या शिफारशीनुसार संतोष पाटील बनकर व रमेश आंधळे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक १३ जुलै रोजी नियुक्तीचे पत्र देण्यात आल्यानंतर बिबी व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संतोष बनकर हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, विशेषतः रस्ते अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करणे, आवश्यक मदत उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उपचारासाठी प्रयत्न करणे, अशा विविध माध्यमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची रुग्ण कल्याण समितीवर नियुक्ती झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
रमेश आंधळे यांच्या नियुक्तीचाही परिसरात स्वागत करण्यात आले असून, या दोन्ही सदस्यांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व रुग्णाभिमुख होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. या निवडीबद्दल दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून बिबी परिसरात समाधानाचे वातावरण आहे.