कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी हरवले असून कामकाज मात्र केले जात आहे, नपा फंडातून मुख्याधिकारी यांचा पगार होत असेल तर नगर पंचायतच्या इतर कर्मचाऱ्याचा दहा-दहा महिने पगार का दिले जात नाहीत, यासह इतर अनेक प्रश्न उपस्थित करत नगर पंचायतचे कार्यालयीन अधीक्षक रवींद्र साठे यांना भाजपाचे अण्णा म्हस्केसह इतरांनी धारेवर धरले.
कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी हरवले आहेत, ते सापडल्यास नगर पंचायतशी संपर्क साधा असा फलक फडकवत नगर पंचायतमध्ये येऊन कार्यालयीन अधीक्षक रवींद्र साठे यांना विविध प्रश्न विचारले; मात्र या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद अण्णा म्हस्केसह विठ्ठल सोनमाळी, आदित्य क्षीरसागर, यांनी यावेळी बोलताना नगर पंचायतीला अनेक पत्र देऊन ही त्याची उत्तरे दिली जात नाहीत.
मुख्याधिकारी गोविंद जाधव हे स्वतः विमान प्रवास करतात त्याचे पैसे नपा फंडातून खर्च केले जातात ज्याचा त्यांना अधिकारच नाही, घन कचरा व्यवस्थापना बाबत शास्त्रोक्त पद्धत कोणती असते हे सांगत नाहीत, आम्ही प्रशासनाला जाब विचारत असताना त्याची उत्तरे देण्याऐवजी नागराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना पुढे करून आमच्यावर राजकीय स्टंटबाजी करत असल्याचा आरोप करतात. मात्र मुख्याधिकारी कर्जत नगर पंचायत कार्यालयात अनेकदा येऊनही भेटत नाहीत, लेखी उत्तरे देत नाहीत असा आरोप करत आगामी काळात आमच्या अर्जाना उत्तरे न दिल्यास लवकरच आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला. यावेळी उमेश जपे, मच्छिन्द्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.