– मुख्यमंत्र्यांची गोविंदांना मोठी भेट
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गोविंदा आणि पथकांकडून करण्यात येत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची ही मागणी पूर्ण केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दहीहंडीचा खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली. यासंदर्भातील सरकारी आदेश देखील शिंदे-फडवणीस सरकारने काढला आहे. प्रो कबड्डीप्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू केल्या जाणार आहेत. या व्यतिरिक्त दहीहंडी खेळणार्या गोविंदाना सरकारी नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती. यानुसार, गोविंदा पथकातील खेळाडुंचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास १० लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला ७ लाख ५० हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला ५ लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.
खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांना राज्य सरकारने सरकारी नोकरीत खेळाडूंसाठी दिलेल्या ५ टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय, १८ वर्षांवरील कॉलेजमध्ये जाणार्या गोविंदांना ग्रेस मार्कही मिळू शकतात. तसंच थर लावण्याचा सराव करायचा असल्यास गोविंदांना कॉलेजच्या वेळेतूनही जायची परवानगी मिळू शकेल.