आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कवी आप्पा भानुदास कुंभार गुरुजीं यांनी कवित्व लेखन केलेल्या श्री ज्ञानेश्वर संजीवन चरित्रामृत या ओवीबध्द ग्रंथाचे प्रकाशन माऊलींचे संजीवन समाधीला स्पर्शित करून लोकार्पण सोहळा आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात वारकरी संप्रदायातील थोर मान्यवरांचे हस्ते हरिनाम गजरात झाला.
या लोकार्पण सोहळ्यास संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, कवी लेखक आप्पा कुंभार गुरुजी, प्रकाशिका सुरेखा गायकवाड,देहू देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्व विक्रमी कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर, नाशिक वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर, लेखक साहित्यिक दत्तात्रय महाराज गायकवाड, निरुपणकार आनंद पेंडुरकर, स्वकुळ साळी ज्ञातीगृहाचे खजिनदार मनोहर दिवाणे, संयोजक आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, व्यवस्थापक माऊली वीर, हमीद शेख यांचेसह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. कवी आप्पा भानुदास कुंभार गुरुजींचे कवित्व लेखन या ग्रंथास लाभले आहे. प्रचलीत वाग्मयात गद्य रुपात संत ज्ञानेश्वरांचे चरित्र विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु पद्य रुपात दिसत नाही. पद्यरचना ही मधूर असून अंतरंगाला भिडणारी असते. किंबहुणा ती आत्म्याची भाषा असते. संत महिपती महाराजांनी २३१ वर्षापुर्वी पद्य रुपातील संत चरित्रे आजही रसाळ वाटतात. त्याप्रमाणे श्रीधर कवींचे वाग्मय आहे.
तब्बल सव्वा दोनशे वर्षानंतर कुंभार गुरुजींच्या रुपाने कवी जन्माला आला. त्यांनी १८ अध्यायात ३ हजार ५०० ओव्यांच्या रुपाने हे ज्ञानदेवांचे चरित्र भाविक,वारकरी यांचे समोर ठेवले आहे. ओवीबद्ध कवित्वासाठी हृदयाची भाषा असते, ती गुरुकृपेने कुंभार गुरुजींना लाभली. शिक्षकी पेशानंतर निवृती काळात त्यांना काव्यस्फूर्ती झाली. सात वर्षे पुर्वी लिहिलेल्या चरित्राचे प्रकाशन माऊलींच्या साक्षीने होत झाले आहे. या श्री ज्ञानेश्वर संजीवन चरित्रामृत ओवीबद्ध ग्रंथाचे भावीक आणि श्रध्दाळू निश्चितच स्वागत करतील असे झाले आहे. या लोकार्पण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत साहित्याच्या प्रचार प्रसारासाठी तसेच अभ्यासकांसाठी लोकार्पण ग्रंथ अमूल्य ठेवा ठरेल असे सांगत मनोगते व्यक्त करीत सद्धीचा दिल्या. संत साहित्यिक दत्तात्रय गायकवाड यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. सामूहिक पसायदानाने लोकार्पण सोहळ्याची सांगता झाली.