– मिड डे मिल कंपनीत काम करणारे मजूर बांगलादेशी तर नाही ना? : परिसरात संशय
चिखली (तालुका प्रतिनिधी) – जालना रोडवरील बेराळा फाटा येथे मुकादम, सुपरवायझर व कामगार यांच्यात झालेल्या जोरदार हाणामारीत एका मजुराचा मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. येथील मिड डे मिल कंपनीत काम करणारे कामगार बांगलादेशी असल्याचा संशय परिसरातून व्यक्त होत असून, पोलिसांनी सर्व कामगार व मुकादमाची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चिखली तालुक्यामध्ये कामगार कल्याण मंत्रालयाद्वारे मजुरांसाठी भोजन तयार करण्याचे काम मिड डे मिल कंपनी यांना देण्यात आले आहे. ही कंपनी जालना रोडवर बेराळा फाट्यापासून जवळच असलेल्या ठिकाणी भोजन तयार करण्याचे काम करते. येथे मुकादम व सुपरवायझर यांचा एका मजुरासोबत झगडा झाला होता. परंतु, त्यावेळी वाद आपसात मिटून घेतला होता. परंतु, त्या भांडणाचा राग मनात धरून पुन्हा त्या तिघांमध्ये मारामारी होऊन एका मजुराचा मृत्यू झाला आहे.
बेराळा फाटा येथे या कंपनीत कामगारासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे, या ठिकाणी बाहेर राज्यातून मजूर आलेले आहेत. तर काही मजूर हे बांगलादेशी असल्याचा संशय बळावला आहे. १६ ऑगस्टरोजी मोहम्मद हुसेन मोहम्मद नूर जमील (वय ३६) हा कामावर गेला असता, सुपरवायझर मोहम्मद मजमल शेख (वय ४२) रा. बिहार व मोहम्मद इमा दादु लष्कर (रा.आसाम) यांच्यात आपसात वाद होऊन सुपरवायझर व मुकादम मिळून मोहम्मद हुसेन नूर जमील यांच्याशी मारामारी झाली. या मारामारीत मोहम्मद हुसेन हा गंभीर जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेत चिखली ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक लांडे यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला होता. या हत्येप्रकरणी संबंधित मुकादम व सुपरवायझर यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास चिखली पोलिस करत आहेत.