– झेडपी निवडणुकीतही उमेदवाराचा खर्च दोन ते तीन कोटी, शंभर बोकडांचाही जातो बळी! कार्यकर्ता होतो उद्ध्वस्त!
– आ. संजय गायकवाडांच्या विधानाने पुन्हा राज्यात चर्चेला ऊत!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – पूर्वीसारख्या निवडणुका आता सोप्या राहिल्या नाहीत. साध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही एका उमेदवाराचा खर्च दोन ते तीन कोटीच्या घरात जातो. एवढेच काय शंभर बोकड्यांचादेखील बळी देण्यास तो मागेपुढे पाहत नाही. या अटीतटीच्या भानगडीत कार्यकर्ता मात्र पार उद्धवस्त व्हायला वेळ लागत नाही. असे निवडणुकीचे ढोबळ तसेच आश्चर्यकारक गणित आमदार संजय गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडले. आगामी दसरा उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता, काल दि. २० सप्टेंबररोजी येथे ओंकार लॉन्सवर आयोजित कार्यकर्ता, पदाधिकारी मेळाव्यात आमदार संजय गायकवाड यांनी याबाबत जाहीर वाच्यता केली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, लवकरच आरक्षण देखील काढण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेचे अद्याप मनोमिलनाचे कुठलेही संकेत मिळाल्याचे दिसत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने शक्यतो स्वबळावरच लढल्या जातात हा आजपर्यंतचा अनुभव आहे. वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून, सर्वच पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. आमदार गायकवाड यांनीही काल, दि.२० सप्टेंबर रोजी बुलढाण्यात ओंकार लॉन्सवर कार्यकर्त्यांचा भरगच्च मेळावा घेतला. यावेळी त्यांनी शिवसेना, भाजप युतीबाबतदेखील भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसेना युतीसाठी तयार आहे. आमदार खासदारकीच्या निवडणुकीत आपण युती करतो, परंतु कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या की? त्यांना वार्यावर सोडून देतो, त्यामुळे कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो. कारण त्याला निवडणुकीचा खर्च झेपावत नाही, म्हणून कार्यकत्याला जपले पाहिजे, असे देखील ते म्हणाले. मलकापूर, खामगाव, चिखलीच्या धर्तीवरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना- भाजपाची युतीची बोलणी झाली पाहिजेत, अशी अपेक्षा देखील त्यांनी युतीबाबत यावेळी व्यक्त केली. एकंदरीत भाजपचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या धर्तीवर युती न झाल्यास स्वबळावर लढण्याचे संकेतच त्यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. दुसरीकडे, निवडणुकीतील खर्चाबाबत आमदार संजय गायकवाड जाहीर कार्यक्रमात बोलल्याने याची चर्चासुध्दा सर्वदूर होताना दिसून येते आहे. विशेष म्हणजे, परिणामाची तमा न बाळगता आमदार संजय गायकवाड नेहमीच बेधडक बोलत असतात.