– दिवाळीत सरकार खाते तुपाशी, तर गोरगरीब जनता मात्र उपाशी!
लोणार (विनोद पाटील तेजनकर) – लोणार तालुक्यातील खेड्यापाड्यात तसेच शहरातसुद्धा महाराष्ट्र शासनाचा आनंदाचा शिधा तर सोडाच पण नियमित मिळणारे रेशनसुद्धा सव्हर्र डाऊन असल्याचे कारण सांगत वाटप करण्यात आलेले नाही. हिंदू धर्मातील सर्वात मोठा व महत्त्वाचा असणारा दिवाळी हा सण, या सणाचे औचित्य साधून केंद्र सरकार व राज्य सरकार आपापल्या कर्मचार्यांना बोनस देत असतात. परंतु गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी मजूर यावर्षी सर्वांची दिवाळी ही परतीच्या पावसामुळे अंधारात गेली आहे. शेतकर्यांची सोयाबीन, कपास व इतर पिके पाण्याखाली गेली, त्यामुळे सामान्य शेतकर्यांना व शेतमजुरांना शासनाच्या रेशन व आनंदाच्या शिधामुळे सामान्यांच्या घरातील दिवाळी गोड होण्यास मदत झाली असती. परंतु ती न होता तालुक्यातील सर्वसामान्यांची दिवाळी ही अंधारातच राहिली आहे.
दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेने आर्थिक स्थिती खालवली आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासनाने अवघ्या शंभर रुपयांत एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो डाळ, एक किलो पाम तेल देण्याचे जाहीर केले होते. परंतु लोणार तालुक्यातील रेशन धारकांना आनंदाचा शिधा तर सोडाच परंतु नियमित रेशनसुद्धा सर्व्हर डाऊन असल्याच्या कारणामुळे मिळाले नाही. लोणार तालुक्यातील वितरण व्यवस्थासुद्धा आर्थिक देवाण-घेवाणशिवाय होत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. आनंदाचा शिधा उशिरा का होईना काही दुकानदारांना मिळाला, तोही अर्धवटच. त्या अर्धवट मिळालेल्या मालाने व बंद असलेल्या मशीनच्या सर्व्हरने दुकानदाराची आणि ग्राहकांची डोकेदुखी व उपासमारीची वेळ वाढली आहे, एवढे मात्र खरे. ई- पॉझ मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थी व स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये चांगलेच खटके उडत असल्याचे पहावयास मिळत आहे.
—————-