-फुलपाकळी येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; कपाशीची झाडे वाळली, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : केवळ एक महिना पावसाळा जाणवला. कपाशी उगवली आणि आता फुलपाकळी येणार म्हणून शेतकरी प्रतीक्षा करत असतानाच पावसाने दडी मारली. फुले उमलण्यापूर्वीच कळी गळून पडल्याने कपाशी पिकाची अवस्था बिकट झाली आहे. तब्बल २० हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशी कडक उन्हामुळे वाळून चालली असून, यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड, राहेरी बु., किनगाव राजा, जांभोरा, रुम्हणा, सोयंदेव, चांगेफळ, बोराखेडी गड्डे, सोनुशी, वर्दडी, भोसा, अडगावराजा, सिंदखेडराजा, पिंपळगाव लेंडी, हनवतखेड, पळसखेड चक्का आणि माळसावरगाव या भागात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातील शेतकरी कपाशीची लागवड मे महिन्यात करतात. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कपाशीची उगवण चांगली व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातात. मे महिन्यात लागवड केल्यानंतर जून महिन्यात समाधानकारक पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते. मात्र, यंदा जून महिना कोरडा गेला. विहिरी आटल्या. त्यानंतर जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने कपाशीची लागवड यशस्वी झाली, या आनंदात शेतकरी असतानाच ऑगस्ट महिन्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे तग धरून असलेल्या कपाशी पिकाची वाढ खुंटली. पाऊस न पडल्याने सप्टेंबर महिन्यात फुलकळी लागत असतानाच उन्हाचा पारा चढला. ऑक्टोबर महिन्यात तर हिवाळ्याऐवजी उन्हाळा सुरू झाल्याने पानगळ झाली आणि फुलेही गळून पडली. आता शेतांमध्ये वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण झाली असून कपाशीची झाडे वाळायला लागली आहेत. तालुक्यातील सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे पीक बाधित झाले आहे. तीच परिस्थिती मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन आणि साखरखेर्डा मंडळातही निर्माण झाली आहे.
बांधावर पाहणी सुरू; ऑनलाइन अहवालाचे आव्हान
सध्या अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करीत आहेत. सर्वच शेतांमध्ये जाऊन ऑनलाइन पाहणी करून अहवाल सादर करण्याचे काम किचकट झाले आहे. काही ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नसल्याने, तर काही ठिकाणी ‘सरोवर’ काम करीत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. महसूल अधिकाऱ्यांनी पिकपेरा ग्राह्य धरून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी प्रल्हाद खरात (जांभोरा) यांनी केली.
मागील अहवालाच्या आधारे याद्या तयार करण्याची मागणी
“आज प्रत्येक ग्राम महसूल अधिकारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत असला, तरी ही पाहणी आणखी किती दिवस चालणार? यापेक्षा मागील अहवाल पाहून याद्या तयार करून अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा आहे. जेणेकरून शेतकरी या प्रक्रियेतून सुटणार नाही,” अशी अपेक्षा शेतकरी संघटनेचे नेते वामनराव जाधव (सिंदखेडराजा) यांनी व्यक्त केली.