-पाणी, पशुधनासाठी चारा, घरकुल आणि मनरेगातील जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य; सीईओ गुलाबराव खरात यांचे निर्देश
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : टंचाईच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता आणि नियोजनबद्ध दृष्टिकोनातून काम करावे. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता, पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ तसेच मनरेगाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन नागरिकांना रोजगारासह दिलासा द्यावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी दिले.
सिंदखेडराजा पंचायत समितीच्या सभागृहात ८ ऑक्टोबर रोजी टंचाईच्या परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील टंचाईची परिस्थिती, पाणीपुरवठा, पशुधनासाठी चारा, घरकुल योजना आणि मनरेगाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. गावपातळीवरील परिस्थितीचा नियमित आढावा घेऊन नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
पाणीटंचाईवर आगाऊ नियोजनाची गरज
टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ नये, यासाठी उपलब्ध जलस्रोत, पाणीपुरवठा व्यवस्था आणि संभाव्य टंचाईग्रस्त भागांचे आगाऊ नियोजन करण्याच्या सूचना खरात यांनी दिल्या. गावागावांतील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी स्थानिक पातळीवर आवश्यक उपाययोजना तयार ठेवाव्यात. पाणीपुरवठ्यात उद्भवणाऱ्या तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून नागरिकांना दिलासा देण्यावर संबंधित यंत्रणांनी भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पशुधनासाठी चाऱ्याचे गावनिहाय नियोजन
टंचाईचा परिणाम नागरिकांसोबतच पशुधनावरही होत असल्याने चारा उपलब्धतेचे गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावातील पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा आणि आगामी काळातील संभाव्य गरज यांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. पशुपालकांना टंचाईच्या काळात आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे खरात यांनी सांगितले.
मनरेगातून जलसंधारणाला गती
टंचाईच्या काळात मनरेगा योजना रोजगारनिर्मितीसोबतच जलसंधारणासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते. त्यामुळे गावागावांत आवश्यक जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. नाला खोलीकरण, बंधारे, जलसंधारणाची विविध कामे तसेच स्थानिक गरजेनुसार मंजूर करता येणारी कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश देण्यात आले. मनरेगाअंतर्गत पात्र वैयक्तिक कामांनाही प्राधान्य देऊन ग्रामीण कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. टंचाईच्या काळात रोजगार उपलब्ध झाल्याने ग्रामीण कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होईल, असेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
घरकुलांची कामे गतीने पूर्ण करा
पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. मंजूर घरकुलांची कामे अनावश्यकपणे प्रलंबित राहणार नाहीत, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून ग्रामपंचायत स्तरावर समन्वय साधत घरकुलांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
कागदोपत्री नव्हे, प्रत्यक्ष उपाययोजनांवर भर
टंचाई ही नागरिकांसाठी गंभीर परिस्थिती असल्याने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याची गरज आहे. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून तातडीने उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांना लवकरात लवकर दिलासा मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सीईओ गुलाबराव खरात यांनी दिले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती
आढावा बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, वित्त व लेखा अधिकारी प्रकाश राठोड, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, सौदागर पवार, सीडीपीओ जीवन राठोड, अभियंता गिरीश मालोकर यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.