– ‘हा भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’; केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात लढा तीव्र करण्याचा प्रशांत जगताप यांचा इशारा
पुणे (शहर प्रतिनिधी) : लोकशाही व्यवस्थेतील ‘उत्तरदायित्व’ या प्राथमिक मूल्याचे रक्षण करण्यासाठी दिल्ली येथे शांततापूर्ण मार्गाने जनआंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर झालेल्या पोलिसांच्या कथित अमानुष वर्तनाच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी बालगंधर्व चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाकडून आजचा दिवस ‘भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येत असून, केंद्र सरकारच्या या दडपशाहीविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाकडून उत्तरदायित्व मागण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे सर्व खासदार जंतर-मंतरच्या दिशेने शांततेच्या व संविधानिक मार्गाने जात असताना पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले. या दरम्यान झालेल्या लाठीचार्जात जनतेचे प्रतिनिधित्व करणारे अनेक खासदार गंभीर जखमी झाले. १४० कोटी नागरिकांचा आवाज दाबण्याचा व लोकप्रतिनिधींवर हल्ला करून संविधानाचा संकोच करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
केंद्रातील भाजप सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्तीचा तीव्र निषेध करण्यासाठी पुण्यातील बालगंधर्व चौकात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि दडपशाहीविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात काँग्रेसचे पुणे शहर (पूर्व) अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, नगरसेवक रफिक शेख, खजिनदार चंद्रशेखर कपोते, भाऊसाहेब आजबे, उपाध्यक्ष राजाभाऊ कदम, इंटकचे अध्यक्ष चेतन अगरवाल, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादल अध्यक्ष लतेंद्र भिंगारे आणि महिला अध्यक्षा स्वाती शिंदे उपस्थित होत्या.
तसेच प्रथमेश अबनावे, संजय मोरे, विजय साबळे, शिवानी मोरे, राहुल वंजारी, गुलामहुसेन खान, राजेंद्र भुतडा, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, दीपक ओव्हाळ, ॲड. योगेश माकणे, किशोर मारणे, धीरज खोरे, समद शेख, प्रियांका मधाळे, ऋषिकेश जाधव, सुभाष जेधे, विशाल जाधव, चैतन्य पुरंदरे, युवराज मदगे, सुरेश नांगरे, सेल्वराज ॲन्थोनी, प्राजक्ता जाधव यांच्यासह काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.