– प्रणव व संजय सीड्सच्या कारभारावर संशय; महिना लोटल्यानंतर ‘उगवणक्षमता नसल्याचा’ बहाणा करत शेतकऱ्यांना गंडा!
– सीड कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, शेतकऱ्यांचे पैसे द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांचा इशारा
चिखली (अंकुश पाटील) : जिल्ह्यात बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे सत्र सुरूच असून, असाच एक संतापजनक प्रकार चिखली तालुक्यात उघडकीस आला आहे. प्रणव सीड्स (जालना) आणि संजय सीड्सच्या माध्यमातून हिवाळी हंगामासाठी कांदा बियाणे खरेदी करण्यात आले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात असून, महिना उलटल्यानंतर “बियाण्याला उगवणक्षमता (जर्मनेशन) आलेली नाही,” असा अजब युक्तिवाद करत कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नितीन राजपूत आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी सदस्य विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली गुंज, सवडद, आमखेड व परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. फसव्या कंपन्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईची हक्काची रक्कम त्वरित अदा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कंपन्यांच्या प्रतिनिधींनी गावात येऊन शेतकऱ्यांशी करार करत प्रति शेतकरी ५० हजार रुपयांप्रमाणे मोबदला देण्याचे ठरवले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी विश्वासापोटी कांदा बियाणे वाहनातून कंपनीकडे पाठवले. मात्र, सर्व पोती एकत्र नेल्यामुळे नेमके बियाणे कोणाचे, हे ओळखणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, विचारणा केली असता “दोन दिवसांत लॅबमधून उगवणक्षमता तपासून कळवतो,” असे आश्वासन देणाऱ्या संबंधित प्रतिनिधींनी आता दोन महिन्यांनंतर बियाणे निकृष्ट असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. या संदर्भात संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
कृषी अधिकाऱ्यांची भेट; आंदोलनाचा इशारा
या गंभीर प्रकाराबाबत शेतकरी नेत्यांसह बाधित शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डाबरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यात अशा अनेक बियाणे कंपन्या शेतकऱ्यांना गंडवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत, कसून चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईस विलंब झाल्यास संबंधित कार्यालय किंवा कृषी विभागासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व कृषी विभागाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.