– गळ्यापर्यंत पाण्यात उतरून कमळजा मातेला घातले साकडे; बालाजी मंदिरात दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना
– मेहकर तालुक्यात वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप आणि ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करत अनोखा जन्मोत्सव
– प्रशासकीय अधिकारी व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले विविध सामाजिक कार्यक्रम
मेहकर (तालुका प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्रशूर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी मेहकर विधानसभा मतदारसंघात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनाप्रमुखांना दीर्घायुष्य लाभावे आणि ते देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशा तीव्र भावना आमदार खरात यांच्यासह उपस्थितांनी व्यक्त केल्या.
वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुखांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी अनोख्या पद्धतीने प्रार्थना करण्यात आली. आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार येथील ऐतिहासिक कमळजा मातेच्या मंदिरात जात, थेट गळ्यापर्यंत पाण्यात उतरून पक्षप्रमुखांच्या दिर्घायुष्यासाठी साकडे घातले. तसेच मेहकर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिरातही विशेष प्रार्थना करण्यात आली.
लोकोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम राखत मेहकर तालुक्यात विविध सामाजिक कार्यांचे आयोजन करण्यात आले:
- वृक्षारोपण: पंचायत समिती आणि तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
- शालेय साहित्य वाटप: तालुक्यातील हिवरा आश्रम येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
- रुग्णसेवा: मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, गटविकास अधिकारी दिनकर खरात, तहसीलदार निलेश मडके, विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, नगरसेवक नितीन तुपे, महेश रिंढे, प्रा. सतीश ताजने, संजय वडतकर, महिला आघाडी तालुका प्रमुख स्वातीताई नवले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.