-आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन; फराळ महाप्रसादाचे वाटप
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटेपासूनच हजारो भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत हरिनामाचा गजर केला. यानिमित्त भाविकांसाठी फराळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
लिंगायत (तेली) समाजातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या बेंदाडे घराण्याची या मंदिराशी दीर्घ परंपरा जोडलेली आहे. सुमारे १५० वर्षांपूर्वी विरशैव धर्मीय असतानाही पांडुरंगावरील अखंड श्रद्धेतून मार्तंड अप्पा गुणाअप्पा बेंदाडे यांनी आपल्या निवासस्थानी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची उभारणी केली. श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती मोठे महाराज यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. विरशैव आणि वैष्णव संप्रदायात कोणताही भेदभाव नसून विठ्ठल चरणी सर्व मानवजात एकच आहे, हा समतेचा संदेश या मंदिराच्या स्थापनेतून देण्यात आला.
आषाढी एकादशीनिमित्त सकाळी ६ वाजता सुधीर अप्पा बेंदाडे आणि शशिकांत अप्पा बेंदाडे या बंधूंनी सपत्नीक महापूजा केली. त्यानंतर महाआरती पार पडली आणि भाविकांनी मोठ्या श्रद्धेने विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी बेंदाडे परिवारासह प्रफुल्ल जडे, अनिल कासार, गोपाल मानतकर, ललित अग्रवाल, महेंद्र पाटील, सोमेश्वर इंगळे, गोटू कासार, विश्वनाथ अप्पा जितकर, अरविंद बेंदाडे, सुनील रिंढे, अशोक अवचार, नितीन सोनुने आदींसह अनेक भाविकांनी महाप्रसादाच्या आयोजनात सहभाग घेतला. हजारो भाविकांनी फराळ महाप्रसादाचा लाभ घेतला. याचबरोबर स्थानिक एस.ई.एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठल-रुक्मिणी पालखीची भव्य मिरवणूक काढत संपूर्ण परिसर भक्तिमय केला. तसेच श्री पलसिद्ध प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनीही पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेत धार्मिक वातावरणात भर घातली.