-ग्रामीण शिक्षणासाठी आयुष्य वाहिले; शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वत्र हळहळ
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथे वास्तव्यास असलेले तसेच गुंज येथील प्रगतीशील शेतकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ शिक्षणप्रेमी तेजराव माणिकराव तुपकर (वय ७६) यांचे २४ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
गुंज या छोट्याशा गावात शेती व्यवसाय करत त्यांनी प्रगतीशील शेतकरी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना ते माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित होते. डॉ. शिंगणे शिक्षण राज्यमंत्री असताना त्यांच्या प्रेरणेतून तेजराव तुपकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकत गुंज येथे कै. भास्करराव शिंगणे विद्यालय स्थापन केले. या संस्थेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली, तसेच अनेक सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
यानंतर त्यांनी सावखेड नागरे येथे श्रीमती प्रभावती काकू शिंगणे विद्यालय सुरू करून ग्रामीण शिक्षणाच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले. शिक्षणाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्यामुळे त्यांना शिक्षणप्रेमी संस्था चालक म्हणून विशेष मान्यता मिळाली. काही दिवसांपासून ते आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, २४ जुलै रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम २७ जुलै रोजी कै. भास्करराव शिंगणे विद्यालय, गुंज येथे आयोजित करण्यात आला आहे.