-दिवंगत अजितदादा पवार व भारतभाऊ बोंद्रे यांच्या जयंती पंधरवाड्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम; शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन जनावरांवर उपचार
अंकुश पाटील (चिखली) : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आणि माजी मंत्री स्वर्गीय भारतभाऊ बोंद्रे यांच्या जयंती पंधरवाड्यानिमित्त चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील कोनड येथे पशु लसीकरण व औषध वाटप शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जनावरे एका ठिकाणी जमा न करता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यावर जाऊन जनावरांचे लसीकरण केले तसेच आवश्यक औषधांचे वाटप केले.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, तालुकाध्यक्ष संतोष परिहार, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण कव्हळे पाटील, सरपंच श्री. झाल्टे, उपसरपंच प्रताप वानखडे, माजी सरपंच संजय वानखडे, विजय जावळे, पंजाबराव जावळे तसेच पशुवैद्यकीय विभागाचे डॉ. सोनटक्के, डॉ. मिसाळ आणि डॉ. पुंगळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.