-जनसेवा सप्ताहात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन; फुगा आणि झाडाच्या उदाहरणातून दिला यशाचा मंत्र
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : मा. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाअंतर्गत दुसरबीड येथील प्रो. जावेदखान उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशस्वी जीवनासाठी ध्येय, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने वाटचाल केली पाहिजे. पाया भक्कम असेल तरच इमारत मजबूत उभी राहते. त्याचप्रमाणे शिक्षणाचा आणि संस्कारांचा पाया मजबूत असेल, तर भविष्यातील यश निश्चित असते,” असे ते म्हणाले.
प्रा. खडसे यांनी विद्यार्थ्यांना समर्पक उदाहरणांद्वारे यशाचे सूत्र समजावून सांगितले. “फुगा हा त्याच्या रंगामुळे आकाशात उडत नाही, तर त्यामध्ये भरलेल्या हेलियममुळे उंच झेप घेतो. त्याचप्रमाणे व्यक्तीचे यश हे बाह्य रूपावर नव्हे, तर ज्ञान, कौशल्य, मेहनत आणि सकारात्मक विचारांवर अवलंबून असते,” असे त्यांनी सांगितले. तसेच प्रतिकूल परिस्थितीतही झाड जसे ठामपणे उभे राहून वाढत राहते, त्याप्रमाणे संकटांना न घाबरता परिस्थिती बदलण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले. “मोठी स्वप्ने पाहा, योग्य नियोजन करा आणि त्यासाठी सातत्याने परिश्रम घ्या,” असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.
करिअरविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रात शंभर टक्के योगदान देण्याचा सल्ला दिला. “प्रामाणिकपणे, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुणवत्तेच्या बळावर यश संपादन करून जीवन सफल करावे,” असे ते म्हणाले. या प्रसंगी “कायदा व सोशल मीडिया”, “आजचे विद्यार्थी व समाज माध्यमे” तसेच “विद्यार्थी आणि त्यांचे करिअर” या विषयांवरही विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख होते.
कार्यक्रमाला किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर, प्राचार्य डॉ. विजय नागरे, प्राचार्य शेख सादीक, प्राचार्य गणेश भांगे, अबरार शेख वाहेद, शेख आबेद शेख खालेद, कचरूजी भारस्कर, जुनेद अली, सागर सांगळे, जाकेर शेख, शब्बीर शेख, नासेर शेख, अक्षय सांगळे, संतोष दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी. टी. साबळे व नय्युम शेख यांनी केले, प्रास्ताविक कचरूजी भारस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन युवा नेते अफसरअली शेख यांनी मानले. यावेळी ज्ञानेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी सुफीयान शेख जाकेर याने स्व. अजितदादा पवार यांचे साकारलेले उत्कृष्ट रेखाचित्र उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.