-दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी; नागरिकांनी बंद पाळून व्यक्त केला तीव्र निषेध
वर्धा (प्रकाश कथले) : रोठा येथील १२ वर्षीय बालिकेच्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ वर्धा शहरासह परिसरातील हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आक्रोश मोर्चा काढला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
मोर्चात महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दर्शविला. “लेकीला न्याय मिळालाच पाहिजे” आणि “दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे” अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला. निवेदनात या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.