-सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नतीप्राप्त शिक्षक आणि गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
चिखली ( राजेंद्र घुबे) : शिवराई महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी व विदर्भ कर्मचारी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सभागृहात सेवानिवृत्त कर्मचारी, सेवा पदोन्नतीप्राप्त अधिकारी-शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराई महिला अर्बनच्या अध्यक्षा सौ. कुसुमताई अंबारकर होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून विदर्भ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, प्रा. विष्णू अंबास्कर तसेच चिखलीचे सहाय्यक निबंधक राजेंद्रजी घोंगे उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी विजय विष्णू पडघान (माजी प्राचार्य, शिवशंकर विद्यालय, भरोसा) तसेच हरिदास ज्ञानबा घुबे (माजी प्राचार्य, जानकीदेवी विद्यालय, देऊळगाव घुबे) यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सेवा पदोन्नती प्राप्त झालेल्या सैय्यद अल्पू गुत्लब (मुख्याध्यापक, पांडव विद्यालय, कव्हळा), बबनराव बाबुराव लांडगे (प्राचार्य, जानकीदेवी विद्यालय, देऊळगाव घुबे) तसेच संदीप जनार्धन वायाळ (प्राचार्य, शिवशंकर विद्यालय, भरोसा) यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याशिवाय कु. गार्गी बाळासाहेब ठाकरे हिने पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल, तसेच डॉ. कु. वेदांती गजानन मवाळ हिने बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत असताना शंभर टक्के आयुर्वेदिक औषधनिर्मिती करून संशोधनात्मक कार्य केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सन्मानार्थींनी आपल्या मनोगतात सेवाकाळातील अनुभव, संघर्ष आणि यशस्वी वाटचालीच्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित मान्यवरांनी सर्व सन्मानार्थींना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराई महिला अर्बन आणि विदर्भ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैय्यद अल्पू सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष मिसाळ यांनी केले.