– जंतर-मंतरवरून CJP चा संसदेवर धडक मोर्चा; राजधानीत पुन्हा एकदा सरकारविरोधात असंतोषाचा उद्रेक!
– केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : नीट परीक्षा घोटाळा, सोनम वांगचुक यांची अटक आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात पेटून उठलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) कार्यकर्त्यांवर आज (दि.20) दिल्ली पोलिसांनी संसदेच्या उंबरठ्यावरच लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जंतर-मंतरवरून सुरू झालेला मोर्चा संसदेकडे कूच करत असताना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या आंदोलकांनी सुरक्षेची तटबंदी मोडून काढल्याने संसदेबाहेर प्रचंड रणकंद माजला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख खासदार संसदेत उपस्थित असतानाच बाहेर आंदोलकांनी थेट संसदेत घुसण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आणि संसदेचे मुख्य प्रवेशद्वार घाईघाईने बंद करण्यात आले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले असून, आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत एक पोलीस उपनिरीक्षकही दुखावला आहे.
कनॉट प्लेस आणि जंतर-मंतरवरील आंदोलकांचे तंबू उखडून टाकत रॅपिड ॲक्शन फोर्सच्या तुकड्यांनी संपूर्ण परिसर छावणीत रूपांतरित केला. केंद्रीय गृहसचिव, दिल्ली पोलीस आयुक्त आणि आयबी प्रमुखांच्या तातडीच्या बैठकीनंतर शेकडो आंदोलकांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलवण्यात आले.
या हिंसाचारादरम्यान सीजेपीच्या प्रतिनिधींनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, सोनम वांगचुक यांच्या सुटकेची आणि NEET-UG उमेदवारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ कोटी रुपयांच्या भरपाईची ठाम मागणी लावून धरली. मात्र, नड्डा यांच्याकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांनी लढा तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या या दमनशाहीचा तीव्र निषेध केला असून, दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयानेही याप्रकरणी सोनम वांगचुक यांच्या वैद्यकीय अहवालाची मागणी करत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आंदोलन तीव्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या ताफ्यासह संसद भवनातून बाहेर पडल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. पीटीआयने याबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. आंदोलकांच्या वाढत्या संख्येनंतर संसद परिसर आणि जंतर मंतर परिसरात छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
आजपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. दरम्यान, अधिवेशन सुरु होताच विरोधकांनी नीटपेपरफुटी आणि राम मंदिर देणगी चोरीवरुन सभागृहात गोंधळ घातला. यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिवेशन स्थगित केले. लोकसभा पाचवेळा तर राज्यसभेचे कामकाज चारवेळा स्थगित करण्यात आले. दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांच्या ५६ वर्षीय तरुण म्हणत टीका केली. दुसरीकडे आंदोलकांवर होणाऱ्या लाठीचार्जचा मल्लिकार्जुन खरगे यांनी निषेध करत, लाठीचार्ज योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.