-बीएलओंच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी; गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या डिजिटायझेशनचे काम वेगाने सुरू असून, या प्रक्रियेला अधिक गती व अचूकता मिळावी यासाठी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांनी सिंदखेडराजा तहसील कार्यालयात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीएलओंना डिजिटायझेशनचे काम विहित मुदतीत, गुणवत्तापूर्ण आणि त्रुटीरहित पद्धतीने पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले. मतदार यादी अद्ययावत व पारदर्शक ठेवण्यासाठी डिजिटायझेशन प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करत प्रा. संजय खडसे यांनी गृहभेटीद्वारे मतदारांची अचूक माहिती संकलित करून ती तातडीने ऑनलाइन पोर्टलवर नोंदविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी बोलताना प्रा. संजय खडसे म्हणाले, “लोकशाही प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हा प्रशासन आणि मतदार यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि पडताळणीची प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. अचूक आणि पारदर्शक मतदार यादी तयार करणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे.”
तहसीलदार अजित दिवटे यांनीही बीएलओंच्या कामाचा आढावा घेत डिजिटायझेशन प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून घेतल्या. संबंधित अडचणींचे तातडीने निराकरण करून शासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, निवडणूक नायब तहसीलदार संदीप बंगाळे, नागेश खरात, गणेश देशमुख, निवडणूक शाखेचे कर्मचारी तसेच मतदारसंघातील मोठ्या संख्येने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणी आणि मार्गदर्शनामुळे मतदार यादीच्या डिजिटायझेशन प्रक्रियेला अधिक गती मिळत असून, २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.