-पीक कर्ज नाही, बोगस औषधांचा मारा; देऊळगाव राजातील शेतकरी संकटात
-“कृषी विभाग जागा होणार कधी?” शेतकऱ्यांचा थेट सवाल; पाच दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
देऊळगाव राजा (सुरेश हुसे) : उशिरा आलेला पाऊस, वेळेत न मिळालेले पीक कर्ज, सावकारांकडून व्याजाने घेतलेले पैसे आणि त्यातच बोगस बियाणे, निकृष्ट खते तसेच बनावट कीटकनाशकांच्या वाढत्या विक्रीमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी १७ जुलै रोजी निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
यंदा मान्सून उशिरा सक्रिय झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या उशिरा झाल्या. त्यात सरकारकडून वेळेत पीक कर्ज उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना खासगी पतसंस्था आणि सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ आली. मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून खरेदी केलेल्या बियाण्यांपैकी अनेक ठिकाणी उगवणच झाली नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कृषी सेवा केंद्रांमधून सर्रास निकृष्ट दर्जाची खते विकली जात असून “बायो”च्या नावाखाली गुजरात, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतील विविध कंपन्यांची संशयास्पद कीटकनाशके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कृषी निविष्ठांचा वापर केल्यानंतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषी विभागाकडून केवळ नमुने घेण्याची औपचारिकता पूर्ण केली जाते; मात्र दोषी कंपन्या आणि विक्रेत्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने बोगस कृषी निविष्ठांची विक्री सुरूच आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आधीच बुलढाणा जिल्हा शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमुळे संवेदनशील मानला जात असताना, पीक कर्जातील विलंब, वाढते उत्पादन खर्च आणि निकृष्ट कृषी निविष्ठांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच तीव्र झाली असल्याची भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून देण्याबरोबरच बोगस कंपन्या व संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच येत्या पाच दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर मधुकर उत्तमराव शिंगणे, शेख जुल्फेकार शेख यासीन, पुरुषोत्तम नारायण शिंगणे, वसंतराव हिम्मतराव पाटील, दत्तात्रय प्रताप इंगळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.