– सुरक्षेचे खांबच चोरीला; सार्वजनिक बांधकाम विभागाचे पोलिसांना पत्र, मात्र कारवाई शून्य!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : तालुक्यातील दुसरबीड नजीक असलेल्या राहेरी येथील ऐतिहासिक पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच, या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सर्रास सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने बसवलेले लोखंडी पोलच चोरट्यांनी लंपास केल्यामुळे हा मार्ग अवजड वाहनांसाठी मोकळा झाला आहे. यामुळे पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, सुरू असलेल्या दुरुस्ती कामालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
राहेरी येथील ऐतिहासिक पुलाची दुरवस्था झाल्याने सध्या त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान पुलावरून अवजड वाहतूक होऊ नये म्हणून राज्य रस्ते महामार्ग विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूंना रस्त्यामध्ये लोखंडी पोल गाडले होते. या पोलमधून दुचाकी, कार आणि इतर लहान वाहनांना जाण्यास जागा होती, मात्र ट्रक, टिप्पर यांसारख्या अवजड वाहनांना बंदी होती.
परंतु, अज्ञात चोरट्यांनी हे लोखंडी पोलच चोरून नेल्याने पुलावरील सुरक्षा यंत्रणा कोलमडली आहे. पोल गायब झाल्यानंतर या मार्गावरून पुन्हा एकदा अवजड वाहनांची, विशेषतः रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची बेकायदेशीर वर्दळ वाढली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. दुरुस्ती सुरू असताना अशा जड वाहनांमुळे पुलाच्या संरचनेला (स्ट्रक्चर) धक्का बसून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
पोलिसांत धाव; तात्काळ कारवाईची मागणी
“अवजड वाहतूक रोखण्यासाठी उभारलेले लोखंडी पोल चोरीला गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात आम्ही यापूर्वीच किनगाव राजा पोलिस ठाण्याशी पत्रव्यवहार केला आहे. अवजड वाहतूक तात्काळ रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीने आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल.”
-
वैभव नाईक, अधिकारी, राज्य रस्ते महामार्ग विभाग.