– “काही समजायच्या आत पाठीमागून काळ आला, धडाधड अंगावरून चाके निघून गेली…”
– ‘माऊली-विठ्ठल’ नामाचा गजर क्षणात आक्रोशात बदलला; वारीच्या वाटेवर सांगलीच्या तीन वारकरी भगिनींचा जागीच अंत
– नांदेडच्या शिधा वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे आली ग्लानी; वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण दुर्घटना
– जखमींवर जेजुरीत उपचार सुरू, एकाची प्रकृती खालावल्याने पुण्याला रवाना
जेजुरी (धम्मप्रिया कांबळे) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारीला आज, सोमवारी सकाळी भीषण अपघातामुळे गालबोट लागले. जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील एका ट्रकने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेत सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून, एकाला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. सासवड–जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर सकाळी हा अपघात घडला.
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीचा हा ट्रक वारीसाठी शिधा घेऊन जात होता. ट्रक चालकाचे वय ७० वर्षे असून, त्याला ताप आल्याने त्याने गोळ्या घेतल्या होत्या. गोळ्यांच्या परिणामामुळे चालकाला ग्लानी (अशक्तपणा) आली आणि त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. हा अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कासबे डिग्रज येथील दिंडीतील वारकऱ्यांच्या अंगावर गेला.
“आम्ही रस्त्याच्या बाजूने शांतपणे चाललो होतो. अचानक पाठीमागून एक मोठा ट्रक आला आणि सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरून निघून गेला,” अशा शब्दांत एका प्रत्यक्षदर्शी जखमी महिलेने हा थरार मांडला.
मृतांची नावे: १. नंदा पवार (वय ६०, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) २. माधवी राजाराम सलगरे (वय ५५, रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) ३. राजश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली)
जखमी वारकरी: अक्काताई बबन कोळी (शिरगाव), शांता शिवप्पा अलकोपर (मिरजवाडी), कासाबाई जगन्नाथ गस्ते (आष्टा), लक्ष्मी विठ्ठल गडदे (नांगोळे), शैलजा दिनकर जगताप आणि मंगल विलास पाटील (दोघी रा. कवलापूर). जखमींवर जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “जेजुरीजवळ झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य सरकारतर्फे मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल,” अशी घोषणा त्यांनी केली. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. जखमींच्या उपचारात कोणतीही कमतरता भासू नये, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. “पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांची सुरक्षा ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, वाहनचालकांनी काळजीपूर्वक वाहने चालवावीत,” असे आवाहन त्यांनी केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जेजुरी येथे ट्रक अपघातामध्ये सांगली जिल्ह्यातल्या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर ३ वारकरी जखमी झाले आहेत. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज,मालगाव आणि कवलापूर येथील महिला वारकरयांचा समावेश आहे. नंदा पवार वय 60, माधवी राजाराम सलगरे वय 55, राजश्री शंकर भोसले वय 55, अशी मृत वारकरी महिलांची नावे आहेत. या घटनेमुळे तिन्ही गावांमध्ये शोककाळा पसरली असून वारकरयांच्या मृत्युच्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये बंद पाळण्यात आले आहे.