-ई-क्लास जमीन घोटाळ्याने खळबळ; महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी युवकांचे महसूल मंत्र्यांना निवेदन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील गट क्रमांक ८७० मधील वर्ग-दोनमधील ई-क्लास जमीन वर्ग-एकमध्ये रूपांतरित करून ती भूमाफियांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साखरखेर्डा येथील युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
साखरखेर्डा येथील गट क्रमांक ८७० मध्ये ई-क्लास जमीन असून, कचरू देवराव कंकाळ, त्र्यंबक कचरू गवई, द्वारकाबाई धोंडू सरकटे, पांडुरंग उकंडा गवई आणि बाबूराव आनंदा गवई या पाच भूमिहीन शेतमजुरांना उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी १ हेक्टर ६० आर जमीन कसण्यासाठी देण्यात आली होती. याच गटातील १ हेक्टर ६२ आर जमीन साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीला क्रीडांगणासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. संस्थेची जमीन कायम असताना उर्वरित पाच लाभार्थ्यांची वर्ग-दोनची जमीन भूमाफियांच्या संगनमताने वर्ग-एक करून त्याच भूमाफियांच्या नावे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुमारे ८ हेक्टर क्षेत्रातील हा व्यवहार झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यातील काही जमिनीवर प्लॉट पाडून विक्रीचाही प्रयत्न सुरू असल्याचा आरोप युवकांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एस.ई.एस. हायस्कूलच्या ताब्यातील क्रीडांगणाची जमीन शासनाने सातबारा उताऱ्यावर ‘सरकार’ म्हणून नोंद केली. यासाठी भाजपचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र, हीच जमीन काही व्यक्तींनी नांगरून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने गावात संतापाची लाट उसळली. ही बाब समोर येताच शेकडो युवक क्रीडांगणावर जमा झाले. उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे आणि ठाणेदार युवराज रबडे यांना याची माहिती देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने जमीन सपाटीकरणाचे आदेश दिले. त्यानुसार १२ जुलै रोजी सकाळी सपाटीकरणाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गट क्रमांक ८७०, ८४३ आणि इतर गटांची मोजणी करून सीमा निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय, सिंदखेडराजा येथील कर्मचारी आले होते. मात्र, प्रत्यक्ष मोजणीचे काम अपूर्ण असतानाही भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी मारोती थोरवे यांनी कार्यालयात बसूनच मोजणी अहवाल तयार करून फेरफार केल्याचा गंभीर आरोप युवा सेना तालुकाप्रमुख संदीप मगर आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस विशाल गवई यांनी केला आहे.
मारोती थोरवे यांच्या कार्यकाळात त्यांच्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याचे सांगण्यात आले. सचिन खंडारे यांनी त्यांची खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली असली तरी ते अद्याप सिंदखेडराजा येथे कार्यरत असल्याने संशय अधिक बळावल्याचे युवकांनी नमूद केले. या ई-क्लास जमीन घोटाळ्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, मोजणी अहवालावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या काही संबंधितांनी या अहवालाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे फेरफार झाल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा सेना तालुकाप्रमुख संदीप मगर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस विशाल गवई, श्याम खरात यांच्यासह शेकडो युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली क्रीडांगणाची पाहणी
१२ जुलै रोजी माजी महसूल राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः क्रीडांगणावर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते रविंद्र पाटील, माजी उपसरपंच सय्यद रफीक, शुभम राजपूत, श्याम खरात, बाबा तिवारी यांच्यासह शेकडो युवक उपस्थित होते.