लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे: आ. श्वेताताई महाले
चिखली (महेंद्र हिवाळे) : चिखली विधानसभा मतदारसंघातील रायपूर गावाच्या मतदार यादीत काही अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद नोंदी समोर आल्या आहेत. या मतदार यादीत “मोहम्मद अफगाणिस्तान”, “बिस्तर पर जाना”, “पुराना”, “तेलगू विकास खिलाडी”, “प्रोडक्ट का जाणकारी”, “साकी” आणि “अंतरवासना” अशा विचित्र नावांचा समावेश असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर एकच खळबळ उडाली असून, चिखली मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीत नमूद केलेल्या या नावांच्या कोणत्याही व्यक्ती गावात अस्तित्वात नाहीत. हे नाव केवळ तांत्रिक घोळामुळे आले की यामागे काही बनावट मतदारांची नोंद करण्याचा प्रयत्न आहे, असा संशय आता व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकारावर बोलताना आमदार श्वेताताई महाले म्हणाल्या, “मतदार यादी हा आपल्या लोकशाहीचा मुख्य पाया आहे. त्यामुळे या यादीतील प्रत्येक नाव अचूक आणि खऱ्या नागरिकाचे असणे बंधनकारक आहे. अशा बनावट किंवा संशयास्पद नोंदींमुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.”
“नागरिकांनी केवळ चर्चा न करता आपापल्या भागातील मतदार याद्या काळजीपूर्वक तपासाव्यात. जर कोणतीही संशयास्पद नोंद आढळल्यास तात्काळ पुराव्यांसह निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवावी. भारतीय लोकशाहीत मताधिकार हा केवळ पात्र भारतीय नागरिकांचाच अधिकार आहे,” असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, रायपूर गावातील या प्रकरणाची संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि या घोळाला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार महाले यांनी प्रशासनाकडे केली आहे. निवडणूक विभाग आता यावर काय पावले उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.