-विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण मोहीम सुरू; वैयक्तिक माहिती, पत्ता, छायाचित्रासह तपशिलांची होणार पडताळणी
चिखली (अंकुश पाटील) : मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेट देऊन त्यांच्या वैयक्तिक माहितीची पडताळणी करत आहेत.
३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांची वैयक्तिक माहिती, पत्ता, छायाचित्र तसेच इतर आवश्यक तपशिलांची पडताळणी करणार आहेत. यावेळी प्रत्येक मतदाराने इन्यूमरेशन फॉर्म भरून बीएलओकडे जमा करणे आवश्यक आहे. हा फॉर्म न भरल्यास किंवा माहितीची पडताळणी पूर्ण न झाल्यास संबंधित मतदाराच्या नावावर परिणाम होऊन ते मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक मतदाराने या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बीएलओ मतदारांशी संपर्क साधण्यासाठी तीन वेळा प्रयत्न करणार आहेत. वारंवार संधी देऊनही इन्यूमरेशन फॉर्म भरला गेला नाही किंवा आवश्यक माहिती उपलब्ध झाली नाही, तर संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. पडताळणीसाठी मतदारांनी ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा तसेच आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे सादर करावीत. या कागदपत्रांच्या आधारे मतदारांची माहिती अचूकपणे पडताळणे सुलभ होणार आहे.
कोट :
“मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवण्यासाठी विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण आणि शहरी भागात बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत. सर्व मतदारांनी बीएलओंना सहकार्य करून इन्यूमरेशन फॉर्म भरून द्यावा, जेणेकरून त्यांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहील.”
– विजय सवडे
तहसीलदार, चिखली