-सुदैवाने जीवितहानी टळली; महावितरणकडून जीर्ण खांब तातडीने बदलण्याची ग्रामस्थांची मागणी
लोणार (वाजिद खान) : लोणार तालुक्यातील दाभा गावातील मुख्य रस्त्यावर अशोक डव्हळे यांच्या घराजवळील जीर्ण झालेला लोखंडी विद्युत खांब अचानक उखडून रस्त्यावर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर शाळकरी विद्यार्थी किंवा नागरिक नसल्याने मोठी जीवितहानी टळली. काही क्षणांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडली असती.
ज्या ठिकाणी हा विद्युत खांब कोसळला, त्या मार्गावर दिवसभर शाळकरी विद्यार्थी, नागरिक तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करून संताप व्यक्त केला. कोसळलेल्या खांबाच्या तळाचा भाग पूर्णपणे गंजून कमकुवत झाल्याचे स्पष्ट दिसून आले. दीर्घकाळ देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दाभा गावातील अनेक लोखंडी विद्युत खांब अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहेत. त्यांच्या वेळोवेळी तपासणी व दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाकडे दाभा गावातील सर्व जीर्ण विद्युत खांबांची तातडीने पाहणी करून धोकादायक खांब त्वरित बदलण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.