-गुलाब शेतीतून आर्थिक प्रगतीचा आदर्श; कृषी विभागाकडून सुनिता आव्हाड यांचा सन्मान
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाच्या वतीने बुलढाणा येथे आयोजित कृषी दिन कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी महिला सौ. सुनिता भानुदास आव्हाड यांना ‘राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
सौ. सुनिता आव्हाड आणि त्यांचे पती भानुदास आव्हाड यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करत एक हेक्टर क्षेत्रावर गुलाब, २० गुंठ्यांत झेंडू तसेच २० गुंठ्यांत इतर फुलपिकांची यशस्वी लागवड केली आहे. विशेषतः गुलाब शेतीत दर्जेदार उत्पादन घेत आर्थिक प्रगती साधत त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गुलाब पिकाच्या लागवडीतील सातत्य, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि आधुनिक शेती पद्धतीचा प्रभावी वापर याची दखल घेत कृषी विभागाने त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले.
पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात होते. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी संतोष ठोंबरे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अमोल झाने, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखाधिकारी प्रकाश राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धीरज वाकोडे, कृषी अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत आणि मोहीम अधिकारी प्रमोद गायके यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सौ. सुनिता आव्हाड यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांनी सेंद्रिय व आधुनिक शेतीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.