-विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित; जिजाऊ जन्मस्थळासह लगतच्या गावांना प्राधान्य देण्याची मागणी
दुसरबीड (भगवान नगरे) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित नवनगर स्मार्ट सिटीमध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केली.
दि. १ जुलै रोजी विधानसभेत बोलताना आमदार कायंदे यांनी सांगितले की, सिंदखेडराजा परिसरात प्रस्तावित कृषी समृद्धी प्रकल्प आणि नवनगर स्मार्ट सिटीच्या विकासामध्ये मतदारसंघातील गावांचा समावेश करणे आवश्यक आहे. विशेषतः मातृतीर्थ राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचा समावेश असलेल्या सिंदखेडराजा भाग-१ व सिंदखेडराजा भाग-२ तसेच नसीराबाद, वाघोरा, खामगाव, खापरखुटी, महारखेड, हनवतखेड, सावखेड तेजन, उगला, पिंपळखुटा, पिंपळगाव लेंडी यांच्यासह इतर लगतच्या गावांचाही या प्रकल्पात समावेश करण्यात यावा. ही मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरली असून, या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ती अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आमदार कायंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रस्तावित कृषी समृद्धी नवनगर स्मार्ट सिटी प्रकल्पाची जबाबदारी एमएसआरडीसीकडून एसपीआयकडे (SPI) सोपविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे अभिनंदन व आभारही व्यक्त केले. या निर्णयामुळे प्रकल्पाला अधिक गती मिळून परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.