– आदिमाया मुक्ताबाईच्या जयघोषाने मेरा चौकी परिसर दुमदुमला; पालखीचे भक्तीभावाने स्वागत
– भरोसा, मेरा बुद्रुकसह परिसरातील भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी; ग्रामस्थांकडून सेवाकार्य
– ३२६ वर्षांची अखंड वारी परंपरा; शिवशंकर विद्यालयात वारकऱ्यांच्या मुक्कामाची चोख व्यवस्था
चिखली (अंकुश पाटील) : ‘साक्षात आदिमाया मुक्ताबाई आपल्या गावात अवतरली’ या अत्यंत भक्तीमय आणि भावुक वातावरणात आज संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे श्री शिवशंकर विद्यालय, भरोसा (मेरा चौकी) येथे जंगी स्वागत करण्यात आले. तब्बल ३२६ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या पालखी सोहळ्यात यंदा सुमारे बाराशे वारकरी सहभागी झाले असून, संपूर्ण परिसरात सध्या विठूनामाचा गजर आणि माउलींचा जयघोष घुमत आहे.
दरवर्षी परंपरेनुसार मुक्ताबाईंची पालखी भरोसा गावात मुक्कामी येत असे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून पालखीचा मार्ग बदलल्याने (उलटा प्रवास होत असल्याने) आता हा मुक्काम मेरा चौकी येथील श्री शिवशंकर विद्यालयात होतो. पालखी गावात आली नसली, तरी भाविकांचा उत्साह तीळमात्र कमी झालेला नाही. मुक्ताबाईंच्या दर्शनासाठी मेरा बुद्रुक, मेरा खुर्द, भरोसा, अंत्रीखेडेकर आणि असोला परिसरातील हजारो भाविकांनी मेरा चौकीकडे धाव घेतली होती.
पालखीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी परिसरातील गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. मेरा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी खास लाडू आणि बेसनवडीचा प्रसाद आणला होता. तर, मेरा खुर्द आणि भरोसा येथील समस्त गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने वारकऱ्यांच्या निवास व भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
“मुक्ताबाईंची पालखी गावात येणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचे पाऊल पडण्यासारखे आहे. सव्वा तीनशे वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या परंपरेचा भाग होता येणे हे आमचे भाग्य आहे.” — स्थानिक भाविक
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या या पालखीचे दर्शन घेऊन परिसरातील अबालवृद्धांनी कृतार्थतेची भावना व्यक्त केली.