-देऊळगाव साखरशा येथे दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे; अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील बसस्थानक परिसरात अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांविरुद्ध जानेफळ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. १८ जून रोजी ही कारवाई करण्यात आली असून, भविष्यातही अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जानेफळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी दिला आहे.
देऊळगाव साखरशा हे मेहकर तालुक्यातील सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्या असलेले आणि शेगाव–मेहकर पालखी महामार्गावरील महत्त्वाचे गाव आहे. गावातील बसस्थानक हे मुख्य महामार्गालगत असल्याने येथे नेहमीच प्रवासी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. शेगावला जाणाऱ्या भाविकांची वाहने तसेच राज्य परिवहन महामंडळाने वाढविलेल्या बसफेऱ्यांमुळे या मार्गावरील वाहतूक अधिकच वाढली आहे. मात्र, काही व्यावसायिकांनी बसस्थानक परिसरात अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. यानंतर जानेफळ पोलीस ठाण्याने विशेष मोहीम राबवून महामार्गालगत अतिक्रमण करणाऱ्या दोन भंगार दुकानदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल केले. संबंधित प्रकरणे न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आजिनाथ मोरे, पोलीस अंमलदार लक्ष्मण पिटकर आणि माधव काळे यांनी केली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
देऊळगाव साखरशा बसस्थानक परिसरातील व्यावसायिकांनी सार्वजनिक रस्ते, वाहतूक मार्ग किंवा नागरिकांच्या ये-जा करण्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी दिला आहे.