-सहाय्यक मुख्यालय अधिकारी मारोती थोरवे यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून निलंबनाची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा भूमी अभिलेख कार्यालयातील सहाय्यक मुख्यालय अधिकारी मारोती थोरवे यांच्या कार्यकाळातील कामकाजाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते देविदास पिराजी सरकटे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी १८ जून रोजी जिल्हा भूमी अधीक्षक, बुलढाणा यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. तक्रार अर्जात मारोती थोरवे यांच्या रुजू झाल्यापासूनच्या संपूर्ण कार्यकाळाची जिल्हास्तरीय तीन सदस्यीय समितीमार्फत खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन केल्याच्या तसेच शेतकऱ्यांची कामे जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित ठेवली जात असल्याचा, तर काही प्रकरणे अल्पावधीत निकाली काढली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या मते, थोरवे यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या मोजणीच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काही प्रकरणांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीची शक्यताही व्यक्त करण्यात आली असून, याबाबत सखोल चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येऊ शकते, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. यामुळे मारोती थोरवे यांनी रुजू झाल्यापासून केलेल्या सर्व मोजणी प्रकरणांची तपासणी करून खातेनिहाय चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनासह कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनाही निवेदन
सदर तक्रार अर्जाची प्रत महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय अमरावती तसेच आमदार संजय गायकवाड यांनाही देण्यात येणार असल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे.
उपोषणाचा इशारा
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही सचिन खंडारे आणि देविदास सरकटे यांनी दिला आहे.