– प्रकृती चिंताजनक; साखरेची पातळी घटली, वैद्यकीय पथकाचा इशारा!
– अकोला-हैदराबाद हायवे रोखला; फत्तेपुरात सरकारी गाडी स्वाहा, तलाठी कार्यालये पेटवण्याचा प्रयत्न!
– मंत्रालयात ‘झाडावर’ तर अरबी समुद्रात ‘जलसमाधी’ आंदोलन; मुंबईत शेतकरी आक्रोशाची धग!
बुलडाणा/मुंबई (बाळू वानखेडे) : बळीराजाच्या छाताडावर सत्तेच्या मढ्यांचे पेढे खाणाऱ्या राज्य सरकारला जाग कधी येणार? संपूर्ण कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस उजाडला आहे, पण या लाचार सरकारच्या छातीचे पाणी हललेले नाही. अन्नाचा एक कणही पोटात न गेल्याने तुपकरांची प्रकृती कमालीची खालावली आहे. शरीरातील साखरेची पातळी धोकादायक पातळीच्या खाली घसरली असून त्यांना तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येत आहे. पुढील काही तास अन्नत्याग सुरू राहिल्यास ‘हायपोग्लासोमिया’चा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा गंभीर इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
तुपकरांच्या खालावत्या प्रकृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संयम आता सुटला असून, राज्याच्या कानाकोपऱ्यात संतापाचा ज्वालामुखी फाटला आहे! सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध आक्रमक झालेल्या बळीराजाने आता थेट ‘आरपारची’ लढाई सुरू केली आहे.
- हायवे जाम: वाशिममध्ये संतप्त शेतकऱ्यांनी अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाहतूक ठप्प केली.
- सरकारी गाड्या स्वाहा: जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे आंदोलकांनी थेट महाराष्ट्र शासनाची ‘टाटा सुमो’ गाडी भरचौकात पेटवून दिली. या धगधगत्या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
- कार्यालयांना लक्ष्य: मेहकर आणि हिवरा आश्रम येथे संतप्त आंदोलकांनी तलाठी कार्यालये थेट पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच वाशिम येथे महावितरणच्या कार्यालयासमोर आग लावून संताप व्यक्त करण्यात आला.
आक्रोशाची धग मुंबईत; मंत्रालयात फटाके, समुद्रात जलसमाधी!
शेतकऱ्यांच्या या जनआक्रोशाची धग आता गाव-तालुक्यांच्या सीमा ओलांडून थेट राजधानी मुंबईत धडकली आहे. लातूरचे शेतकरी सागर चालवड यांनी थेट मंत्रालय परिसरात एका उंच झाडावर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले. एवढेच नव्हे तर झाडावरच फटाके फोडून त्यांनी या कुंभकर्णी सरकारचा निषेध केला. दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या एका पथकाने मुंबईच्या अरबी समुद्रात उतरून थेट ‘जलसमाधी’ आंदोलन पुकारले. समुद्राच्या लाटांपेक्षाही तीव्र लाटा शेतकऱ्यांच्या संतापाच्या उसळत आहेत.
दिल्लीश्वरांचे पाय चाटण्यात मश्गूल असलेल्या या राज्य सरकारला राज्यातील अन्नदात्याचा हा आक्रोश दिसत नाही काय? तुपकरांच्या जिवाला काही बरे-वाईट झाले, तर महाराष्ट्राचा शेतकरी मंत्रालयाचे दगड सुटे केल्याशिवाय राहणार नाही, हा अंतिम इशारा आहे! वेळीच जागे व्हा, अन्यथा शेतकऱ्यांच्या या रोषात तुमचे सत्तेचे सिंहासन जळून खाक होईल, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत!