-उमेदवारीनंतर राजकीय समीकरणांना वेग; चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष
वर्धा (प्रकाश कथले) : वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी मिळवत तगडे आव्हान उभे केले आहे. शेतकरी विकासासाठी त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे तसेच जनसंपर्काच्या बळावर त्यांनी या भागात मजबूत जनाधार निर्माण केला असल्याचे बोलले जात आहे.
मागील निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवाराला कडवी झुंज दिली होती. त्यामुळे यंदाची निवडणूकही अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. अद्याप भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नसला तरी भाजपकडून लाखानी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाविकास आघाडीने शैलेश अग्रवाल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले असून, ते विजय खेचून आणतील असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे. आतले-बाहेरचे असा कोणताही भेदभाव न करता सर्व स्तरांतील कार्यकर्ते आणि मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
तथापि, भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून ही लढत अत्यंत अटीतटीची होईल, याबाबत राजकीय निरीक्षकांमध्ये एकमत आहे. काँग्रेससोबत दीर्घकाळ निष्ठेने राहिल्याचे फळ शैलेश अग्रवाल यांना उमेदवारीच्या रूपाने मिळाल्याची चर्चा देखील सुरू आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतील या चुरशीच्या लढतीकडे वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.