-चिखली तहसील कार्यालयात १ जून रोजी भव्य जनता दरबाराचे आयोजन
चिखली (महेंद्र हिवाले) : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने “जनतेच्या सेवेसाठी – जनता दरबार” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत तहसील कार्यालय, चिखली येथे जनता दरबार संपन्न होणार आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार श्वेताताई महाले पाटील या विकासकामांसाठी आणि जनसंपर्कासाठी ओळखल्या जातात. नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
या जनता दरबारात महसूल, आरोग्य, शिक्षण, कृषी, पाणीपुरवठा, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या तक्रारी व समस्या ऐकून त्यावरील कार्यवाही तातडीने करण्यात येणार असून ज्या समस्या जागेवर सोडविणे शक्य आहे त्यांचा निपटारा दरबारातच केला जाणार आहे. इतर प्रश्नांबाबत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देऊन पाठपुरावा केला जाणार आहे.
चिखली तालुक्यातील शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित अडचणी असलेले नागरिक या जनता दरबारात सहभागी होऊ शकतात. नागरिकांनी आपले नाव, गाव, मोबाईल क्रमांक आणि समस्येचे लेखी निवेदन सोबत आणावे, असे आवाहन आमदार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे सांगत आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी नागरिकांना या जनता दरबाराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.