-पाणी वापर संस्था कायदा २००५ विषयी सविस्तर मार्गदर्शन; सिंचन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत पाणी वापर संस्थांच्या समित्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक जानकीदेवी विद्यालय, देऊळगाव घुबे येथे ३० मे २०२६ रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ पाटील थुट्टे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. रेणुकादास भारसवाडकर व अनिल कंठवार उपस्थित होते, तर शेनफडराव घुबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ‘जलपुरुष’ स्वर्गीय भारतभाऊ बोंद्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या जलसिंचन क्षेत्रातील योगदानाला अभिवादन केले. प्रशिक्षणादरम्यान डॉ. रेणुकादास भारसवाडकर यांनी पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण का आवश्यक आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ‘पाणी वापर संस्था कायदा २००५’ मधील विविध तरतुदी, नियम आणि संस्थांच्या जबाबदाऱ्यांची माहिती उपस्थितांना समजावून सांगितली. सिंचन व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शिस्तबद्ध करण्यासाठी पाणी वापर संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात एकनाथ पाटील थुट्टे यांनी खडकपूर्णा प्रकल्पातील विविध पाणी वापर संस्थांसमोर असलेल्या अडचणी व समस्यांचा आढावा घेतला. या समस्यांवर योग्य नियोजन आणि समन्वयातून मात करून संस्थांचे कामकाज अधिक सक्षमपणे कसे राबविता येईल, याबाबत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांपर्यंत सिंचनाचा लाभ प्रभावीपणे पोहोचण्यासाठी संस्थांनी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख उपस्थित शेनफडराव घुबे यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय भारतभाऊ बोंद्रे यांच्या जलचळवळीतील योगदानाचा गौरव केला. तळागाळातील आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाची आठवण करून देत, त्यांचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रशिक्षण कार्यक्रमात खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या ११ पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ‘खंडोबा पाणी वापर संस्था’ आणि ‘वसुंधरा पाणी वापर संस्था’ यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी योगेश सरोदे यांनी केले. या प्रशिक्षणामुळे पाणी वापर संस्थांच्या कामकाजाला अधिक गती मिळण्यास मदत होणार असून, सिंचन व्यवस्थापन अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केला.