-शिवमहापुराण कथेत महिलांच्या सन्मानाचा संदेश; शिव-पार्वती विवाह सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : “ज्या घरात कन्या आहे, त्याच घरात लक्ष्मी नांदते, हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे महिलांचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे,” असे प्रबोधन शिवमहापुराण कथाकार प्रेममूर्ती जगदिशानंद शास्त्री यांनी शिवमहापुराण कथेतून केले.
२४ मे रोजी शिवमहापुराण कथेच्या चौथ्या दिवशी कथा सादर करताना त्यांनी प्रजापतींची कथा विषद केली. “राजा कितीही मोठा असला तरी तो प्रजेच्या रक्षणासाठी असतो. मग ती कन्या असो, माता असो किंवा बहीण; सर्वांना समान न्याय देण्याची वृत्ती आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “घरातील भांडण घरातच ठेवावे. सून कशी आहे यापेक्षा ती या घरची लक्ष्मी आहे, हे लक्षात ठेवावे. महिला घरात असल्यामुळेच घरात स्वच्छता आणि संस्कार टिकून राहतात. ज्या घरात स्वच्छता असते, तेथे लक्ष्मीचा वास असतो.” सद्गुरूंच्या दरबारात जाताना कोणत्याही संगतीची गरज नसते. भक्ती श्रद्धापूर्वक असावी लागते. “जी वस्तू तुमची नाही तिचा हट्ट करू नका; परंतु जी वस्तू तुमची आहे ती तुमच्याजवळ राहणारच,” असे सांगत त्यांनी दानधर्म आणि अहंकार त्यागाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगलाष्टके आणि सुमधुर संगीतामुळे हजारो श्रोते मंत्रमुग्ध होऊन नृत्य करत होते. विचारपीठावर मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्यासह अनेक गुरुवर्य उपस्थित होते.
विशाल शामियाना, बसण्याची व्यवस्था आणि तळपत्या उन्हात थंड फवार्यांची सुविधा यामुळे भाविकांना कोणतीही अडचण जाणवली नाही. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली होती. सकाळी शिवपाठ, श्री पलसिद्ध महास्वामी समाधीस्थळी रुद्राभिषेक, पारायण, व्याख्यान तसेच सायंकाळी लक्ष्मण महाराजकृत शिवपाठ आणि रात्री कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. शिवपाठादरम्यान महिलांची पावली हे विशेष आकर्षण ठरत आहे. महाप्रसाद वितरणात स्वयंसेवकांची शिस्त लक्षवेधी ठरत असून पाणी वाटपाची जबाबदारी मदनलाल जैस्वाल आणि नंदकिशोर रिंढे हे पार पाडत आहेत. शिव-पार्वती विवाह सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांनी कन्यादान म्हणून संस्थानला पाच हजार ताटांचे दान दिले.