-रस्ता वाद आणि प्रशासकीय अनास्थेमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : चिखली तालुक्यातील मौजे भरोसा येथे अरुंद रस्ता आणि वहिवाटीच्या वादामुळे मक्याने भरलेली ट्रॉली पलटी होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २२ मे रोजी घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भरोसा येथील शेतकरी अरुण तेजराव थुटे यांच्या शेतातील मक्का ट्रॅक्टर क्रमांक एमएच २८ सीसी ४३२१ या ट्रॉलीत भरून भरोसा ते आंचरवाडी रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक ३३३ मधील पांदण रस्त्याने आणण्यात येत होता. यावेळी आंचरवाडी रोडवर ट्रॉली चढविताना ती अचानक पलटी झाली. त्यामुळे ट्रॉलीतील मक्का रस्त्यावर सांडून मोठे नुकसान झाले. घटनास्थळी उपस्थित पंच आणि शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, रस्त्याच्या उत्तर दिशेची वहिवाट बंद करण्यात आल्यामुळे चालकाने पश्चिम बाजूने ट्रॉली काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्ता अरुंद असल्याने ट्रॉलीचा तोल जाऊन अपघात घडला. या घटनेवेळी उद्धव थुटे, मल्लू हटकर, विशाल थुटे, सागर कवळे, अमोल थुटे, नंदकिशोर थुटे तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, शासन ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. भरोसा परिसरातील अनेक रस्त्यांची प्रकरणे चिखली तहसील कार्यालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर रस्त्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास शेती मशागत आणि पेरणीची कामे करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.