-सर्वधर्म समभाव जोपासणारे पवित्र स्थान : त्र्यंबक स्वामी नंदगावकर यांचे प्रबोधन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : “वीरशैव आणि वारकरी संप्रदायाचा संगम म्हणजे श्री पलसिद्ध महास्वामी मठ असून येथे सर्वधर्म समभावाची शिकवण दिली जाते,” असे प्रतिपादन शि. भ. प. त्र्यंबक स्वामी नंदगावकर यांनी आपल्या कीर्तनातून केले.
साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात आयोजित सात दिवसीय शिवमहापुराण कथेअंतर्गत २३ मे रोजी रात्री त्र्यंबक स्वामी यांनी कीर्तन सेवा सादर केली. यावेळी त्यांनी दक्षिणेकडील उज्जयिनी मठाचे ६० वे जगद्गुरु श्री पलसिद्ध महास्वामी यांनी वीरशैव लिंगायत धर्माची पताका खांद्यावर घेऊन भारतभर भ्रमण केले आणि अखेर साखरखेर्डा नगरीत स्थायिक झाल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, या मठाचे जगद्गुरु लक्ष्मण शिवाचार्य महाराज यांनी मठाचा इतिहास आणि श्री पलसिद्ध महास्वामी यांच्या कार्याची माहिती समाजासमोर आणली. शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज मठाधिपती झाल्यानंतर त्यांनी मठाचा मोठ्या प्रमाणात विकास केला. महाराष्ट्रातील २४ मठांचे मुख्य केंद्र साखरखेर्डा असून या मठाचा विस्तार मोठा आहे.
मठामध्ये विद्यार्थ्यांना धर्मसंस्कारांसोबतच शिक्षणाचीही व्यवस्था करण्यात येते. येथून घडलेले युवक समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत. “येथे सर्वांसाठी मंदिर खुले आहे. ऐक्याची भावना जोपासत सर्वधर्म समभावाची शिकवण दिली जाते,” असेही त्यांनी नमूद केले. कीर्तनादरम्यान वाल्या कोळी आणि नारदमुनी यांच्या कथांचे दाखले देत त्यांनी श्रोत्यांना जीवनमूल्यांचा संदेश दिला. “आई-वडील आणि संत हेच खऱ्या अर्थाने आपले हित जोपासतात,” असे सांगत त्यांनी संतपरंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. मठाची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या खांद्यावर सोपविली असून ते विविध ठिकाणी धर्मप्रसाराचे कार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी विचारपीठावर सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज उपस्थित होते.