– वासनिक, सपकाळ यांचे विश्वासू; राहुल बोंद्रेंच्या १० वर्षांच्या कार्यकाळाची सांगता!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियाना’ंतर्गत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष बदलांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश रामभाऊ अवचार (पाटील) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यानंतर आता पक्षाने जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील अवचार यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे सोपवली आहेत. अनेक वर्षांनंतर पक्षाने ‘घाटाखालील’ नेत्याला संधी दिल्याने राजकीय वर्तुळात या निवडीला विशेष महत्त्व दिले जात आहे.
प्रकाश अवचार हे अखिल भारतीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. मावळते अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या कार्यकाळात त्यांनी २०१६ पासून जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पक्षाच्या निरीक्षकांनी जिल्ह्यात घेतलेल्या आढावा बैठका आणि अंतर्गत चाचपणीनंतर पक्षश्रेष्ठींनी अवचार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही संघटनात्मक बांधणी महत्त्वाची मानली जात आहे.
१ जानेवारी १९६५ रोजी जन्मलेले प्रकाश अवचार हे कलाशाखेचे (बी.ए.) पदवीधर असून शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यांनी १९९१ मध्ये युवक काँग्रेसचे ग्रामशाखा अध्यक्ष म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. यानंतर विविध कार्यकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघात संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २००६ पासून ते जिल्हा परिषद सदस्य होते, तर २००७ ते २००९ या काळात त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. सध्या ते जळगाव जामोद बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
राहुल बोंद्रेंच्या १० वर्षांच्या कार्यकाळाची सांगता!
मावळते जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सलग १० वर्षे जिल्हा काँग्रेसची धुरा सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने तळागाळातील कार्यकर्ते आणि तरुण चेहऱ्यांना संघटनेत संधी दिली. बूथ स्तरापर्यंत संघटनात्मक जाळे मजबूत ठेवण्यात आणि कठीण राजकीय परिस्थितीतही पक्षसंघटन टिकवून ठेवण्यात बोंद्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नव्या निवडीनंतर आता जिल्ह्यातील पक्षसंघटन अधिक व्यापक करण्याचे आणि सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याचे आव्हान नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश अवचार यांच्यासमोर असेल.