-इंधन टंचाईमुळे शेतकरी व वाहनधारकांची गैरसोय, पंपांवर तणावपूर्ण परिस्थिती
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गेल्या काही दिवसांपासून देशभरात इंधन टंचाईची स्थिती निर्माण झाली असून याचा सर्वाधिक फटका शेतीकाम करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांना बसत आहे. साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी ड्रम व कॅनमधून इंधन भरण्याचाही प्रकार दिसून आला.
साखरखेर्डा येथे दोन पेट्रोल पंप असून दर चार दिवसांनी पेट्रोल व डिझेलचे टँकर येतात. सुमारे ३ हजार लिटर पेट्रोल आणि ९ हजार लिटर डिझेल उपलब्ध होत असून काही तासांतच इंधन संपल्याचा फलक लावला जातो. त्यामुळे अनेक वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. आज दुपारी दोन्ही पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा दिसून आल्या. डिझेल व पेट्रोल कधी उपलब्ध होईल याची निश्चित माहिती नसल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सकाळी पाटील ब्रदर्स पेट्रोल पंपावर डिझेल आल्यानंतर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी कॅन व ड्रम ठेवून इंधन भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोन्ही पंपांवर वाहनांशिवाय कॅन किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास मनाई असल्याचे सांगण्यात आले.
इंधन टंचाईमुळे शेतीची कामेही रखडली असून रब्बी हंगामातील काढणीनंतर आता मशागतीची कामे सुरू आहेत. नांगरणी, वखरणी यांसारखी कामे वेळेत होण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरचालकांवर अवलंबून आहेत. मात्र डिझेलअभावी कामे थांबल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. काही ट्रॅक्टरचालक “डिझेल द्या, बाकी पैसे नंतर” अशा अटीवर काम करत असल्याने पंपांवर कॅन व ड्रमची गर्दी वाढत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लागलेल्या रांगेत ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मोहाडी येथील सरपंच बबन काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही, असा आरोपही करण्यात येत आहे.
साखरखेर्डा व मलकापूर-पांग्रा परिसरात अशा घटनांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पेट्रोल पंप चालक अरविंद बेंदाडे व रवींद्र पाटील यांनी सांगितले की, “काल रात्रीपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. इंधन आवक कमी असल्याने सर्वांना पुरवठा करणे कठीण होत आहे. उपलब्धतेनुसार प्रत्येकाला डिझेल व पेट्रोल देण्याचा प्रयत्न केला जात आहे.” सध्या परिसरातील पेट्रोल पंपांवर तणावपूर्ण परिस्थिती असून इंधन मिळवण्यासाठी वाहनधारकांची मोठी झुंबड उडत आहे.