-पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा, शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यात इंधन टंचाईची समस्या गंभीर बनली असून, मलकापूर पांग्रा येथील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या गर्दीत वाहन मध्ये घातल्याच्या कारणावरून १६ मे रोजी रात्री हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मलकापूर पांग्रा येथील श्रीयान पेट्रोल पंपावर १६ मे रोजी डिझेल व पेट्रोलचा टँकर दाखल झाला होता. रात्री ११ वाजता टँकर खाली झाल्यानंतर इंधन विक्री सुरू करण्यात आली. डिझेल आल्याची माहिती परिसरातील गावांमध्ये पसरताच शेकडो वाहनचालकांनी आपली वाहने पेट्रोल पंपावर आणून उभी केली. दरम्यान, शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर चालक मोठ्या प्रमाणात कॅनमध्ये डिझेल भरण्यासाठी गर्दी करू लागले. वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना मोठ्या प्रमाणात कॅनमध्ये डिझेल भरले जात असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. जागदरी येथील एका वाहनचालकाने थेट आपले वाहन मध्ये घातल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर काही वाहनधारकांनी वाद घालत संबंधित व्यक्तीला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या गोंधळादरम्यान साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पीएसआय गणेश डोईफोडे हे पेट्रोलिंग करत असताना घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला. सध्या ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून जून महिना जवळ आल्याने नांगरणी, वखरणी आणि इतर शेतीकामांसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. ट्रॅक्टर चालविण्यासाठी डिझेल अत्यावश्यक असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कॅनद्वारे डिझेल घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
दरम्यान, काही जण मोठ्या प्रमाणात पेट्रोल कॅनमध्ये भरून त्याचा साठा करत असून १६० रुपये दराने पेट्रोलची विक्री करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. यावर प्रशासनाने तातडीने अंकुश ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शेतकरी पंडितराव नरवाडे यांनी प्रशासनाला उपाय सुचवत, “ट्रॅक्टर चालकांना तहसीलदार व पोलीस प्रशासनाने टोकन व्यवस्था सुरू करावी. ज्यांच्याकडे टोकन असेल त्यांनाच कॅनमध्ये डिझेल देण्यात यावे. त्यामुळे पेट्रोल पंपांवरील गर्दी आणि गोंधळ कमी होईल,” अशी मागणी केली आहे.